Friday, June 18 2021 5:45 pm

महापौर आणि आयुक्तांनी केली पडझड आणि सखल भागांची पाहणीरस्त्यावरील कचरा, झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

ठाणे  :अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई, पाणी साचणाऱ्या सखल भागांची आणि पडझड झालेल्या ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टीमुळे शहरातील पाणी साचण्याऱ्या ठिकाणी पंप लावणे, रस्त्यावर वाहून आलेल्या कचरा तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले.

हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविल्यानंतर काल पासून शहरात जोरदार पावसाला सुरु झाली आहे. त्यानुषंगाने महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज शहरातील चिखलवाडी येथून नालेसफाई तसेच पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यास सुरूवात केली.

या पाहणी दौऱ्यामध्ये शिवसेना पक्ष गटनेते दिलीप बारटक्के, लोकमान्य नगर सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा सौ. आशा डोंगरे, नगसेविका सौ. मालती पाटील, सौ. नम्रता पमनानी, सौ. मीनल संख्ये, सौ. कांचन चिंदरकर, नगरसेवक भरत चव्हाण, विकास रेपाळे, संतोष वडवले, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

चिखलवाडीनंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी महर्षी वाल्मीनी मार्ग, मायानगर कोपरी,पनामा सुपरमॅक्स कंपनी, आईमाता मंदिर चौक, महात्मा फुले नगर तसेच ज्ञानेश्वर नगर येथील नाल्याची पाहणी केली. पनामा येथील नाल्याच्या ठिकाणी महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी नाला रूंदीकरण करण्याची सूचना केली.

चिखलवाडी येथे मुसळधार पावसात नेहमीच पाणी साचणे त्या ठिकाणी पंप लावण्यात आले असून इतर अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान महापौर व आयुक्तांनी तेथील नागरिकांशी संवाद साधून येथील समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

अतिवृष्टीमुळे शहरात रस्त्यावर वाहून आलेल्या कचरा आणि पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलणे, पाणी साठलेल्या ठिकाणी सबमर्सियल पंप लावून तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या इतर उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले.