Saturday, September 18 2021 2:09 pm
ताजी बातमी

मनसे पदाधिकारी गजानन काळेचा अटकपूर्व जामीन ठाणे कोर्टानं फेटाळला

 

नवी मुंबई : मनसे पदाधिकारी गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे कोर्टानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झालीय. काळे यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची १५ पथकं विविध भागात रवाना झाली आहेत. असं असलं तरी अद्याप गजानन काळेचा शोध लागू शकलेला नाही. काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचा मोबाईल बंद आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळे नवी मुंबई शहराबाहेर आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी १५ पथकं रवाना केली आहे. दरम्यान, काळेला लवकरात लवकर अटक केली जाईल, असा दावा पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी केलाय. दरम्यान, गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.

शर्मिला वहिनींनी माझी सर्व बाजू ऐकून घेतली. त्या मला नक्की न्याय देतील, अशी प्रतिक्रिया संजीवनी काळे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी संजीवनी काळे यांनी आपल्या पतीवर घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा खळबजनक आरोप केला होता. त्यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार आहे.

या पार्श्वभूमीवर संजीवनी काळे गेल्या काही दिवसांपासून न्याय मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. संजीवनी काळे शनिवारी सकाळी आपल्या वडिलांसोबत राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आल्या होत्या. मात्र, राज ठाकरे सध्या पुण्यात असल्यामुळे संजीवनी काळे यांना त्यांची भेट घेता आली नाही..