Friday, June 18 2021 5:29 pm

मध्य रेल्वेवर एसी लोकलचा शुभारंभ, कुर्ल्याहून पहिली लोकल रवाना.

कल्याण  : पश्चिम रेल्वेनंतर अखेर आता मध्य रेल्वे मार्गावरही एसी लोकल धावू लागली आहे. विरार-चर्चगेट, ठाणे-पनवेल पाठोपाठ आता मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर एसी लोकलला सुरुवात झाली आहे. कुर्ला येथून आज पहिली एसी लोकल रवाना झाली असून सेवेला शुभारंभ झाला आहे.

दरम्यान सामान्य लोकलच्या काही फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांच्या नाराजीला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात चार एसी लोकल असून यातील एक टाळेबंदीआधी ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर चालवण्यात येत होती. तिच्या दिवसाला १६ फेऱ्या होत होत्या. करोनाकाळात ही लोकल तात्पुरती बंद आहे.

प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत असल्याने ट्रान्स हार्बरवरही वातानुकूलित सेवा लवकरच पुर्ववत केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या सात एसी लोकल असून त्यातील एकच सेवेत आहे. तिच्या दिवसाला १२ फेऱ्या होतात.

आता एक एसी लोकल गुरुवारपासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर चालवली जाणार आहे. सध्या करोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा लाभ होणार नसला, तरी रेल्वे सर्वांसाठी सुरू होईल तेव्हा अधिकाधिक वापर होईल, अशी रेल्वेला आशा आहे. तिकीट दर अधिक असल्याने पश्चिम आणि ट्रान्स हार्बर या दोन्ही मार्गावर काही फे ऱ्या वगळता या गाडय़ांना प्रतिसाद कमी आहे.

मध्य रेल्वेवर या गाडय़ांना प्रतिसाद कसा मिळतो, याकडेही रेल्वेचे लक्ष आहे. पहाटे कुर्ल्याहून सीएसएमटीसाठी ५.४२ वाजता सुटेल. त्यानंतर डोंबिवलीसाठी सकाळी ६.२३ वाजता सुटणार आहे. यात सीएसएमटी ते कुर्ला ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते डोंबिवली ते सीएसएमटीसाठी प्रत्येकी चार लोकल फेऱ्या होतील. तर सीएसएमटी ते कल्याण ते सीएसएमटी अशा दोन फेऱ्या होतील…!