Friday, May 14 2021 12:46 pm
ताजी बातमी

प्रधानमंत्री मुद्रा योजना: ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर सुमारे ९८८ कोटींचे कर्ज वाटप

ठाणे दि १५: ठाणे जिल्ह्याने यंदा देखील प्रधानमंत्री मुद्रा योजनेत समाधानकारक कामगिरी केली असून यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत ९८७ कोटी ७० लाख रुपये कर्ज वाटप करून अनेकांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या स्वप्नांना हातभार लावला आहे. आज जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी लीड बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन मार्च अखेरीस जास्तीत जास्त लोकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळून कर्ज प्रत्यक्ष त्यांच्या हातात कसे पडेल हे पाहण्याच्या सुचना दिल्या.लीड बँक मुख्य व्यवस्थापक अनिल सावंत यांनी यावेळी या योजनेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ जिल्ह्यांत ठाणे आहे अशी माहिती दिली. सर्वाधिक २००२ कोटी रुपये वाटप पुणे जिल्ह्याने केले तर मुंबई उपनगर ने १००७ कोटींचे वाटप केले आहे. यंदा मुद्रा योजनेत शिशु गटात २२१ कोटी २९ लाख, तर किशोर गटात ३९६ कोटी ९६ लाख आणि तरुण गटात ३४८ कोटी ५५ लाख रुपये कर्ज दिले आहे. एकंदर ९३ हजार ३४९ जणांना ९६६ कोटी ८० लाखांचे वाटप झाले असून यामुळे जिल्ह्यातील छोट्या व्यावसायिकांना, कुटिरोद्योग, बचत गटातील महिला यांना पाठबळ मिळाले आहे.गेल्या वर्षी देखील ठाणे जिल्ह्याने उद्दिष्टांपेक्षा जास्त कर्ज वाटप केले होते.  एकंदर १ लाख ११ हजार १०० जणांना ९८७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. मुद्रा योजनेत लहान व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज देण्यात येते. या योजनेत तीन प्रकार आहेत. 1) शिशु कर्ज 2) किशोर कर्ज 3) तरुण कर्ज. शिशु कर्ज या मध्ये 50 हजार रुपये पर्यंत कर्ज, किशोरांसाठी 50 हजार ते 5 लाखांपर्यत व तरुण कर्ज योजनेत 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते. या तीन कर्जावर आकर्षक व्याज दर आकारण्यात येतो. कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. या योजनेत दिलेले  हे मुद्राकार्ड मुख्यत: कृषि क्षेत्राच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतु नुकतेच कृषि क्षेत्राला पुरक असणाऱ्या व्यवसायासाठीही  या अंतर्गत कर्ज मिळते.छोटे व्यवसाय जसे भाजीपाला विक्री करणारे, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीन टाकणे, खाणवळ, स्वत:चे ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थ विक्री करणारी गाडी टाकणे, पोल्ट्री फार्म, सेवा देणारा उद्योग अशा प्रकारच्या कुठलाही लघु उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.