Friday, June 18 2021 4:25 pm

पाच पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले तर संपूर्ण इमारत सील करणार

मुंबई : राज्यभरातील कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढतान दिसत आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे महापालिका सतर्क झाली असुन, या पार्श्वभूमीवर आता नवी गाइडलाईन जारी करण्यात आली आहे. यानुसार आता एका इमारतीत पाच पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले तर ती संपूर्ण इमारतच सील केली जाणार आहे.

याशिवाय मुंबईतील गर्दीची ठिकाणांवर पालिकेची नजर असेल. कोरोनाविषयक नियम पायदळी तुडविणारी हॉटेल, तसेच मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या वाढत असल्‍याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे.

वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करावेत. मास्‍कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये ३०० मार्शल्‍स नेमावेत सूचना केल्‍या आहेत

तसेच मुंबईतील मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्‍ण आढळणाऱया इमारती प्रतिबंधित (सील) कराव्‍यात, यासह विविध कडक सूचना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी केल्‍या आहेत. यावेळी आयुक्‍त चहल म्‍हणाले की, जून-जुलै २०२० मधील स्थितीच्‍या तुलनेत आजही कोविड १९ संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे.

असे असले तरी कोविडचे रुग्‍ण वाढत असल्‍याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्‍यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड १९ प्रतिबंधात्‍मक निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे, कारण करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्‍यास अधिक कठोरपणे कारवाई करुन वेळीच संसर्गाला अटकाव होणे आवश्‍यक आहे, असे सांगून आयुक्‍तांनी वेगवेगळ्या सूचना केल्‍या.