Wednesday, December 1 2021 6:05 am
latest

पंतप्रधानांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन.

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या कच्छमध्ये अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करणार आहेत. याचवेळी जगातील सर्वात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाचं देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. सरकारकडून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, या कार्यक्रमांदरम्यान शेतकरी व कारागिरांशी देखील मोदी संवाद साधणार आहेत.

खवडा येथील जगातील सर्वात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाची मोदी पायाभरणी करतील. तसेच, दुपारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अरबी समुद्र किनाऱ्यावरील मांडवी येथील डिसेलिनेशन प्लांटची देखील पायाभरणी केली जाणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची उपस्थिती असणार आहे.

३० हजार मेगावॅटचा पर्यायी वीज निर्मिती प्रकल्प जगातील सर्वात मोठा असणार आहे आणि वीजनिर्मितीसाठी पवनचक्क्या व सौर पॅनल यांची या ठिकाणी उभारणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी कच्छ आणि सौराष्ट्र भागातील अन्य चार डिसेलिनेशन प्लांट्सचे व्हर्चुअली भूमिपूजन करणार आहेत.

यामध्ये कच्छमधील गुंडियाली, देवभूमी द्वारकामधील गंधवी, भावनगरमधील घोघा आणि सोमनाथमधील सुत्रापाडा येथील प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी कच्छ जिल्हा सहकारी दूध उत्पादक यूनियन, सरहद डेअरी यांनी अंजार आणि भाचाऊ जिल्ह्यात उभारलेल्या २ लाख लिटर क्षमतेच्या दूध शीतकरण केंद्राचे देखील ऑनलाइन भूमिपूजन करणार आहेत.

तसेच, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १२९ कोटींच्या संपूर्ण स्वयंचलित दुग्धशाळेची पायाभरणी देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत.