Friday, June 18 2021 4:37 pm

नोटाबंदीमधील सर्व CCTV फुटेज ठेवा; सर्व बँकांना RBIचा आदेश

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ८ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीतील त्यांच्या शाखा आणि चलनाबाबतचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे फुटेज ठेवावे लागणार आहे. जेणेकरून अंमलबजावणी संस्थेला नोटाबंदी दरम्यान बेकायदेशीर कामात गुंतलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात मदत होईल.

८ नोव्हेंबर, २०१६ रोजी काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी आणि दहशतवादाचा निधी रोखण्यासाठी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. बंद झालेल्या नोटा त्यांच्या बँकांमध्ये जमा करायच्या किंवा त्यांची देवाणघेवाण करण्याची सरकारने लोकांना संधी दिली होती.

मागे घेतल्यानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटादेखील जारी करण्यात आल्या. नोटा बदलून घेण्यासाठी किंवा त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी देशभरातील बँकांच्या शाखांच्या बाहेर प्रचंड गर्दी दिसून आली. तर तपास यंत्रणांनी नवीन नोटा बेकायदेशीरपणे आपल्याकडे जमा करुन ठेवल्या या प्रकरणांची चौकशीही सुरू केली.

अशा छाननीसाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना पुढील आदेश येईपर्यंत नोटाबंदीच्या कालावधीतील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग नष्ट करू नये, असे सांगितले आहे.