Wednesday, December 1 2021 5:01 am
latest

नितेश राणेंना धक्का, ‘सरपंच राणें’च्या हाती शिवबंधन

कणकवली:  शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली गावात भाजपचे सरपंच काका राणे, अमोल राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधले. कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जानवली गावचे सरपंच काका राणे, अमोल राणे यांच्यासह रजत राणे, राजेश परब, पांडुरंग मेस्त्री या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवबंधन बांधून या सर्वांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे आमदार नितेश राणे यांना शिवसेनेने धक्का दिला आहे.

शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

याआधी नाईक आणि राणे अर्थात शिवसेना आणि भाजपमध्ये सिंधुदुर्गात अनेक वेळा रस्सीखेच झाली आहे. सेना-भाजपमधील नेते-कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्यामध्ये उड्या मारताना पाहायला मिळालं आहे.

वैभव नाईकांनाही दिलेला धक्का

कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला होता. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत भाजपची सत्ता आली. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात शिवसेनेला धक्का देत राणेंनी कुडाळच्या सभापतींना भाजपात आणलं होतं.

नाईकांकडून तीन दिवसात वचपा

नितेश राणेंनी सुरुंग लावल्याचा प्रकार ताजा असतानाच अवघ्या तीन दिवसात वैभव नाईक यांनी वचपा काढला होता. कट्टर राणे समर्थक पंचायत समिती सदस्याला शिवसेनेत प्रवेश देत नाईकांनी राणेंवर पलटवार केला होता. कट्टर राणे समर्थक असलेल्या कुडाळ पंचायत समिती सदस्या निलिमा वालावलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात

फेब्रुवारी महिन्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकारी-कार्यकत्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला होता. भाजप खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला होता.