Friday, May 14 2021 12:36 pm
ताजी बातमी

नाशिकमध्ये चक्कर येऊन पडल्याने एकाच दिवशी ९ जणांचा मृत्यू

नाशिक : चक्कर येऊन पडल्याने नाशिक शहरात एकाच दिवसात ९ जण दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वीही चक्कर आल्याने चौघा जणांचा २४ तासांच्या काळात मृत्यू झाला होता. नाशिकमधील नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात नऊवर गेला आहे. तर गेल्या तीन दिवसांतील आकडा १३ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती.

गेल्या काही दिवसात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. नाशिक शहराचं तापमान वाढून ४० अंशाच्या पार पोहोचलं आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चक्कर येणे, मळमळ होणे यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला नाशिक शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतानाही काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.