Friday, June 18 2021 6:05 pm

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद चिघळणार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेची बॅनरबाजी

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरील वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलीय. विमानतळाच्या नामकरणावरुन प्रकल्पग्रस्त विरुद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होत आहे. दरम्यान, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली भूमिका नुकतीच स्पष्ट केली आहे. शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या नावामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. (Dispute over naming of Navi Mumbai International Airport)

या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. “नाव तर आम्ही साहेबांचेच देणार, मराठी अस्मिता जगभर होणार” अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत. सर्व प्रकल्पग्रस्त ‘दिबां’च्या नावावर ठाम असताना शिवसेना मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे. याबाबत शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. खारघरमध्ये पार पडलेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख शिरीष घरत देखील उपस्थित होते.

स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावामागे ठामपणे उभा राहणार

दि. बां. पाटलांबद्दल आदर आहेच, मात्र दि. बां. च्या नावावरून राजकारण करू पाहणाऱ्या राजकीय पक्षांच्या राजकारणाला बळी न पडता स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावामागे ठाम पणे उभा राहणार असल्याचे मत पनवेल, नवी मुंबई आणि उरण परिसरातील स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव सिडकोमार्फत करण्यात आल्याने विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी मागील काही वर्षांपासून आग्रही असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत.