Friday, August 6 2021 8:03 am

नवी मुंबईत उभारणार ‘सायन्स पार्क’, सिडकोकडून मनपाची मागणी मान्य

नवी मुंबई:  वंडर्स पार्क उद्यानालगत सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेला भूखंड दिला जाणार आहे. नवी मुंबईत सायन्स पार्क विकसित करण्यासाठी भूखंड देण्याचा निर्णय नुकतंच घेण्यात आला आहे. यानुसार सिडको महामंडळाने नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर्स पार्क उद्यानाच्या भूखंडाची पोटविभागणी केली आहे.

यातील विभाजित केलेला भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेला सायन्स पार्क विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने सेक्टर- १९ ए, नेरूळ येथील भूखंड क्र. ५० हा नवी मुंबई महानगरपालिकेला चिल्ड्रन्स थिम पार्क विकसित करण्याकरिता भाडेकराराने दिलेला होता. त्यानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेने या भूखंडावर वंडर्स पार्क उद्यान विकसित केले आहे.

त्यानंतर, नवी मुंबई महानगरपालिकेने वंडर्स पार्कमधील ३.४ हेक्टर क्षेत्रावर सायन्स पार्क उभारण्याची परवानगी देण्याची विनंती सिडकोकडे केली. यानुसार सिडकोकडून काही अटींवर, २.०० हेक्टर क्षेत्रावर सायन्स पार्क उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. सायन्स पार्क विकसित करण्याकरिता सदर भूखंड क्र. ५० ची भूखंड क्र. ५० व ५०ए अशी पोटविभागणी करण्यात येणार आहे.

वापर बदल करून ५०ए हा २.०० हेक्टरचा भूखंड नवी मुंबई महानगपालिकेस सायन्स पार्क विकसित करण्याकरिता हस्तांतरीत करण्यात येणार आहे. नवी मुंबईच्या पायाभूत विकासाबरोबरच शहराचा सामाजिक व सांस्कृतिक विकास साधण्यास सिडकोने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यांस अनुसरून, वंडर्स पार्क अंतर्गत सायन्स पार्कच्या उभारणीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सायन्स पार्कसारख्या प्रकल्पामुळे सांस्कृतिक प्रगतीबरोबरच विज्ञानविषयक दृष्टीकोन व जाणीव विकसित होण्यास मदत होणार आहे,” अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.