Friday, May 14 2021 1:39 pm
ताजी बातमी

तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज राहू – उद्धव ठाकरे

मुंबई : कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून, तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल, तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे देखील आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवार) उद्योगांना केले आहे.

यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला. राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले.

बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगीतले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरु करतील असेही सांगण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे येथील निर्बंधांचा संपूर्ण देशातील उद्योग- व्यवसाय आणि वितरण साखळीवर परिणाम होतो आणि म्हणूनच हे निर्बंध आम्ही अतिशय जड अंतकरणाने लावले आहेत.

उद्योगांनी ऑक्सिजनची उपलब्धता त्वरेने करून देण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्धल त्यांनी धन्यवाद दिले तसेच एफडीए आयुक्तांनी पुढील कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या.