Friday, August 6 2021 8:16 am

ठाण्यातील डान्सबारप्रकरणी पोलिसांबरोबरच ,उत्पादन शुल्क विभागावरही कारवाई करण्याची भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे :ठाण्यातील डान्यबारप्रकरणी केवळ पोलिसांवरच नव्हे तर उत्पादन शुल्क खात्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाचे अधीक्षक आणि उपअधीक्षकांना याप्रकरणी निलंबित करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले होते. त्या; राष्ट्रवादीच्याकडेच उत्पादन शुल्क आणि पोलिस खाते असताना सर्रास डान्सबार सुरु आहेत. या कृतीचा आम्ही निषेध करतोच, परंतु केवळ पोलिसांवर कारवाई करुन चालणार नाही, तर याला राज्य उत्पादन शुल्क खाते देखील तेवढेच जबाबदार आहे. राज्य उत्पादन शुल्क किंवा गृहमंत्री यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले आणि उपअधीक्षक चारुदत्त हांडे यांना देखील निलंबित करणार काय ? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना पडलेला आहे.

माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की तत्काळ या दोन अधिकाऱ्यांवर तसेच राज्य उत्पादन शुल्क खात्यावर देखील कारवाई केली पाहिजे. राज्यात अशा प्रकारचे डान्सबार सुरु असल्याने कडक कारवाईमुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाला जबाबदारीचे भान येईल, अशी जोरदार टिप्पणी श्री. लाड यांनी केली.