Friday, May 14 2021 12:28 pm
ताजी बातमी

ठाण्यातील गंभीर परिस्थितीबाबत भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकभारत विकास परिषदेची हॉस्पिटल चालविण्याची तयारी

ठाणे : ठाणे शहरात ऑक्सिजन टंचाई, अपुरे बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई, टोसिझुमैब इंजेक्शनचा अनावश्यक वापर आदींबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपाच्या वतीने काल गुरुवारी करण्यात आली. त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या सहकार्याने भारत विकास परिषदेकडून ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल चालविण्याची तयारी असल्याचे नमूद करण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात भाजपाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक झाली. या वेळी भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, भाजपाच्या डॉक्टर सेलचे प्रमुख महेश जोशी आदींची उपस्थिती होती. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थित राहून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

ठाणे शहरात ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड आहेत, पण ऑक्सिजनअभावी रुग्णांना दाखल केले जात नाही. तर अत्यवस्थ रुग्णांना बेड शोधण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होत आहे. शहरातील हॉस्पिटलला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा केल्यास बेड उपलब्ध होत नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. तर टोसिझुमैब इंजेक्शनचा वापर केला जात आहे. मात्र, टोसिझुमैब परिणामकारक नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या संदर्भात डॉक्टरांना आवश्यक निर्देश द्यावेत. तसेच ठाण्यातील हॉस्पिटलला गरजेएवढा ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.
कोरोना उपचारासाठी परवानगी असलेल्या हॉस्पिटलला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. मात्र, मान्यता नसलेल्या हॉस्पिटलमधील रुग्णांनाही रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. तरी या हॉस्पिटलला तातडीने मान्यता देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.
कोरोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना केवळ २० टक्के ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तर काही रुग्णांना जादा ऑक्सिजन पुरवठा गरजेचा असतो. मात्र, शहरातील बहुसंख्य रुग्णालयात २० टक्के ऑक्सिजनची गरज असलेले अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना उपचार करण्यात अडचणी येतात. या परिस्थितीत ठाणे महापालिकेच्या अंतर्गत भारत विकास परिषदेने २० टक्के ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल चालविण्याची तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर भारत विकास परिषदेला हॉस्पिटलची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती खासदार विनय सहस्रबुद्धे व आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या रुग्णालयासाठी आमदार निधी देण्याची तयारी असल्याचे श्री. डावखरे यांनी नमूद केले. त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
आपण सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन कोरोना आपत्तीवर मात करू. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.