Wednesday, December 1 2021 5:24 am
latest

जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.नरहरी शेळके एसीबीच्या जाळ्यात

बीड – सुनावणी सुरु असलेल्या एका प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांच्या सांगण्यावरून १ लाख १५ हजारांची लाच स्वीकारताना पुरवठा विभागातील लेखा परीवेक्षक बब्रुवाहन फड यास आज सकाळी बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्हाभरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, या प्रकरणातील तक्रारदराने तीन महिन्यापूर्वी बीड शहरातील धानोरा रोड येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानात गैरव्यवहार होत असल्याबद्दल तक्रार दिली होती. त्यावरून जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी चौकशी करून सदर दुकानाचा परवाना रद्द केला. याचा राग मनात धरून या दुकानाच्या परवानाधारक लव्हाळे यांनी तक्रारदाराबद्दल डॉ. शेळके यांच्या कार्यालयात तक्रार केली होती. डॉ. शेळके यांनी याप्रकरणी तक्रारदार विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस दिली होती. याप्रकरणाची सुनावणी डॉ. शेळके यांच्यासमोर सुरु होती. यामध्ये तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी डॉ. शेळके आणि त्यांच्या कार्यालयातील जिल्हा लेख परीवेक्षक बब्रुवाहन परमेश्वर फड यांनी दोन लाखांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेस प्राप्त झाली होती.
बीड एसीबीने सदर तक्रारीची खातरजमा केली असता डॉ. शेळके आणि फड यांनी तडजोडीअंती १ लाख १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निदर्शनास आले. या माहितीच्या आधारे बीड एसीबीने आज दि. २२ मार्च रोजी सापळा रचून बीड येथील शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या जोशी उद्यानासमोर बब्रुवाहन फड यास १ लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून डॉ. एन आर. शेळके यांना ताब्यात घेण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. हि कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक अर्चना जाधव, पोलीस कर्मचारी दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, राकेश ठाकूर, प्रदीप वीर, अमोल बागलाने, मनोज गदळे, सय्यद नदीम यांनी केली. दरम्यान, महसूलमधील उच्चपदस्थ अधिकारी एसीबीच्या सापळ्यात अडकल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
शेळकेंची आमदाराविरोधात तक्रार
‘बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित हे महसूल मंत्र्यांकडे तुमच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तेव्हा त्यांची भेट घेऊन तोडपाणी करा’असा निरोप सुभाष पाटील नावाच्या व्यक्तीने आपल्याकडे पोहचवला होता, असं शेळके यांनी तक्रारीत म्हटलं होतं.बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डॉ. शेळके यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करावी, अशी मागणी शेळके यांनी केली होती.अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन तक्रार केल्याचा राग मनात धरुन आमदार अमरसिंह पंडित व त्यांच्या पीएविरुद्ध शेळकेंनी खोटी तक्रार दिल्याचा आरोप आहे.