Wednesday, December 1 2021 5:11 am
latest

जागतिक अस्तिरतेतही टीजेएसबी बँक अव्वल – ढोबळ नफ्याची द्विशतकी झेप

ठाणे: महाराष्ट्रासह पाच राज्यात विस्तारेल्या ठाणे जनता सहकारी (टीजेएसबी) बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात 15 हजार कोटींचा मिश्र व्यवसाय,202 कोटींचा ढोबळ नफा आणि स्वनिधी 1 हजार 1 कोटी असे तीन पल्ले गाठून बँक सक्षम बनली आहे.असा दावा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल साठे यांनी केला.त्यामुळे जागतिक स्थित्यंतरातही बँकिंग क्षेत्रात टीजेएसबी बँक अव्वल ठरली आहे.जागतिक अर्थकारणातील स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर बँकेनं यंदाही आर्थिक परिस्थितीत सातत्य राखल्याचे साठे यांनी सांगितले.बँकेचा एकूण व्यवसाय हा 15 हजार 340 कोटी रूपये झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ 7 टक्के आहे.बँकेच्या ठेवींमध्येही साडेपाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून बँकेच्या कर्ज वितरणातही सव्वा नऊ टक्के वाढ झाली असून यंदा बँकेला 202 कोटी रूपयांचा ढोबळ नफा झाला.नफ्यातील ही वाढ जवळपास 20 टक्के असल्याचे साठे यांनी सांगितले.यंदा बँकेला 126 कोटींचा निव्वळ नफा झाला असून नफ्यातील ही वाढ 23 टक्के आहे.या आर्थिक वर्षात नोटबंदी,जीएसटी,भांडवलीकरणाची पुनर्रचना,दिवाळखोरीचा कायदा यांचा प्रभाव असतानाही बँकेने केलेली आर्थिक कामगिरी प्रभावी असल्याचे बँकेचे अध्यक्ष सी. नंदन गोपाल मेनन यांनी सांगितले.2022 मध्ये बँकेला 50 वर्ष पूर्ण होत असून अर्धशतकात प्रवेश करताना 25 हजार कोटींचा व्यवसाय आणि 200 शाखांचं उद्दिष्ट समोर ठेवले असल्याचे मेनन यांनी सांगितले.ज्यावेळी आव्हानात्मक प्रसंग येतात, अवघड परिस्थिती निर्माण होते त्यावेळी त्यावर मात करण्याची नवी उमेद तयार होते.बँकेने खडतर काळातही संधी मानून आपल्या कामकाजाची दिशा ठरवत घवघवीत यश प्राप्त केल्याचे सुनिल साठे यांनी सांगितले. बँक 46 सहकारी बँकांना माहिती तंत्रज्ञान विषयक सेवा देत असून बँकींग व्यवसायाबरोबरच इतर उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले.बँकेला यंदा उत्पन्नाच्या इतर माध्यमातून 81 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाल्याचेही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साठे यांनी सांगितले.