Friday, May 14 2021 1:21 pm
ताजी बातमी

चिखलोली स्थानकासाठी रेल्वेमंत्री सकारात्मक खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली पियुष गोयल यांची भेट

ठाणे – वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी चिखलोली स्थानकाबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, या मागणीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली. मध्य रेल्वेने हॉल्ट स्टेशनचा प्रस्ताव पाठवला असला तरी आर्थिक व्यवहार्यता तपासून परिपूर्ण दर्जा असलेले स्थानक उभारण्याची मागणीही खा. डॉ. शिंदे यांनी केली. या दोन्ही मागण्यांबाबत श्री. गोयल यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन उपनगरांची लोकसंख्या दिवसेनदिवस वाढत आहे. त्याचा स्वाभाविक ताण या दोन्ही उपनगरांच्या रेल्वेस्थानकांवर येत आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांच्या मध्ये चिखलोली स्थानक करण्याची मागणी फार पूर्वीपासून होत आहे. मधल्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मे २०१४ मध्ये खासदार झाल्यापासून ही मागणी लावून धरली. लोकसभेत शून्य प्रहरात हा प्रश्न उपस्थित केला. तसेच, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, विद्यमान रेल्वेमंत्री पियुष गोयल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार केला. मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सूद यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये चिखलोली स्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. मात्र, त्यावर बोर्डाने काहीही निर्णय न घेतल्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार विद्यमान महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी पुन्हा १८ सप्टेंबर २०१७ रोजी रेल्वे बोर्डाकडे चिखलोली स्थानकाबाबतचा प्रस्ताव पाठवला.

या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने जलदगतीने मान्यता द्यावी, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली. केवळ हॉल्ट स्टेशनच नव्हे, तर व्यावहारिकदृष्ट्याही रेल्वेला फायदेशीर ठरावे, असे स्थानक उभारण्याची मागणी केली असता, त्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून मागवण्यात येईल आणि त्वरित निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही गोयल यांनी दिली.