Friday, May 14 2021 12:47 pm
ताजी बातमी

ग्लोबल कोविड हॉस्पिटलचा बोजवारा;३० टक्के कर्मचारी, युनानी डॉक्टरांची भरतीभाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांचा आरोप

ठाणे : महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील कारभाराचा बोजवारा उडाला आहे. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कंत्राटदाराकडून क्षमतेपेक्षा अवघ्या ३० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याचे खात्रीलायक सूत्रांवरून समजते. तर चक्क कर्नाटकातील एका विशिष्ट महाविद्यालयात उत्तीर्ण युनानी डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत, असा धक्कादायक आरोप भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी आज येथे केला. त्याचबरोबर शहरातील रुग्णांचे प्राण वाचविण्यााठी खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांनाही ग्लोबलमध्ये दाखल करून खासगी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे आवाहन श्री. डुंबरे यांनी केले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणेकरांना बेड उपलब्ध न होण्याबरोबरच अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. तर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून हट्टाने तयार करून घेतलेली व्होल्टास, बुश आदी हॉस्पिटले धूळ खात पडून आहेत. तर कळव्यातील भूमिपूत्र व कौसा येथील रुग्णालय सुरू करता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार यांनी ग्लोबल कोविड हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ग्लोबल कोविड हॉस्पिटलची क्षमता १०२४ रुग्णांची आहे. या रुग्णालयात २४ तासांसाठी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, केवळ ३० टक्के कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात आली. डॉक्टरांची संख्याही कमी आहे. त्यात एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टरांऐवजी चक्क युनानी पदवीधारक डॉक्टर कार्यरत आहेत. ते कर्नाटकातील एका विशिष्ट महाविद्यालयातील असल्याचा आरोप श्री. डुंबरे यांनी केला. डॉक्टरांबरोबरच नर्स, वॉर्डबॉय आदी कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांना वेळेवर उपचारही मिळत नसावेत, अशी भीती श्री. डुंबरे यांनी व्यक्त केली.

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सुमारे ९०० ते एक हजार नागरिकांना दररोज कोरोनाची लस दिली जात आहे. या ठिकाणीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असल्यामुळे, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे, याकडे श्री. डुंबरे यांनी लक्ष वेधले. या ठिकाणाऐवजी शहरातील विविध भागातील केंद्रांवरच लसीकरण केल्यास हॉस्पिटलवरील ताण कमी होईल. त्याचबरोबर लसीकरणासाठी येणाऱ्या वृद्ध नागरिकांना संसर्गाचा धोकाही टाळता येईल, असे श्री. डुंबरे यांनी सांगितले.
ग्लोबल कोविड हॉस्पिटलसह महापालिकेच्या अन्य हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. मात्र, या कंपनीची मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता नाही. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीही श्री. डुंबरे यांनी केली.
खासगी डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित
शहरातील खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजनअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काही खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांना केवळ ऑक्सिजनसाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन श्री. मनोहर डुंबरे यांनी केले.