Wednesday, December 1 2021 5:06 am
latest

गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदीही ‘चंद्रकांत पाटील’, पहिल्यांदाच मराठी माणसाकडे धुरा

गुजरात : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी माणसाची वर्णी लागली आहे. योगायोग म्हणजे महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही ‘चंद्रकांत पाटील’ नामक नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नवसारीचे भाजप खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील उर्फ सी. आर. पाटील यांच्या गळ्यात गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे.

खासदार पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. जवळपास गेल्या तीस वर्षांपासून ते नवसारीमध्ये कार्यरत आहेत. पाटील २००९ पासून भाजपच्या तिकीटावर सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या वाराणसी मतदारसंघाच्या विकासाचा कार्यभार सी. आर. पाटील यांच्यावर सोपवण्यात आला होता.

पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. खासदार सी. आर. पाटील हे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकारुत येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म पिंप्री अकारुत येथेच झाला. त्यांचे शिक्षण आयटीआयपर्यंत झाले आहे. सुरतमध्ये १९८९ मध्ये पोलिस कॉन्स्टेबलपदी ते भरती झाले होते. त्यानंतर सुरतमध्ये सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

जीआयडीसीच्या अध्यक्षपदापासून भाजपची संघटनेतील अनेक महत्वाची पदे त्यांनी सांभाळली आहेत. दरम्यान, लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्याकडे कालच लडाख भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यासंदर्भात घोषणा केली. कलम ३७० रद्द करण्याच्या समर्थनात नामग्याल यांनी केलेल्या भाषणामुळे पंतप्रधान मोदीही प्रभावित झाले होते…