Friday, August 6 2021 7:41 am

आश्चर्यम : बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत राज ठाकरे चक्क मास्कमध्ये

पुणे : दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते. त्यामुळे दोघांच्या भेटीसोबतच राज ठाकरेंनी घातलेल्या मास्कचीही सर्वत्र चर्चा रंगली होती.

राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली. बाबासाहेब पुरंदरे पुढच्याच आठवड्यात वयाची ९९ वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं वयोमान आणि संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावत काळजी घेतल्याचं दिसतं.

राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. मार्च महिन्यात नाशिक दौऱ्यात त्यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त गेलं होतं.

दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे…!