Friday, June 18 2021 4:54 pm

आता लर्निंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही

मुंबई : कोरोनामुळे कार्यालये बंद असल्याने आणि निर्बंध असल्यामुळे प्रवास करण्यावर मर्यादा येत असल्याने अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या या समस्येवर पर्याय शोध महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

तसे आदेश राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी नागरिकांना आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेबद्दलची माहिती दिली.

लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओकडून परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लर्निंग लायसन्स दिलं जातं. ही परीक्षा आरटीओ कार्यालयातच घेतली जात होती. त्यामुळे नागरिकांकडे कार्यालयात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. करोना लॉकडाउनमुळे या परीक्षेबद्दल राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.

राज्यात आता लर्निंग लायसन्ससाठी द्यावी लागणारी परीक्षा घरातूनच देता येणार आहे. यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे. “परिवहन विभागाने राज्यातील ५० आरटीओ कार्यालयाना मंगळवारी तसे आदेश दिले आहेत. या सुविधेमुळे आर्थिक आणि सामाजिक लाभ होणार आहे. कार्यालयात होणार गर्दी कमी होणार असून, दलाली संपेल आणि भ्रष्टाचारही कमी होईल.

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरील कामांचा भार कमी होणार असून नागरिकांच्या वेळेत व खर्चात बसत होईल,” असं ढाकणे म्हणाले. ही सुविधा पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.