Friday, May 14 2021 12:26 pm
ताजी बातमी

अण्णासह मंत्र्यांना हि उपोषणास सामोरे जावे लागले

मुंबई-: अण्णा हजारेंच्या उपोषणाचा काल सातवा दिवस होता. मात्र अण्णांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या मंत्र्यांनाही उपवास घडला. लोकपाल, लोकायुक्ताची नेमणूक आणि कृषिमूल्य आयोगाच्या स्वायतत्तेबद्दल निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी काल उपोषण सोडलं. अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन काल राळेगणला आले होते. त्यांनी अण्णांसोबत जवळपास साडे पाच चर्चा केली. दुपारी दोनपासून या बैठकीला सुरुवात झाली. ही चर्चा संध्याकाळी साडेसातच्या सुमारास संपली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अण्णांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि अण्णांच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती दिली. यानंतर अण्णांनी उपोषण सोडलं.
मुख्यमंत्री अण्णांच्या भेटीसाठी दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झाले. त्यानंतर बंद दाराआड अण्णा हजारे, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची चर्चा सुरू झाली. है चर्चा जवळपास साडेपाच तास चालली. अण्णा हजारेंचं उपोषण सुरू असल्यानं राळेगणसिद्धीतील सर्वांनी चूल बंद ठेवली होती. सर्व ग्रामस्थ आणि मुलं दिवसभर यादवबाबा मंदिरासमोर बसून होते. ग्रामस्थांनी जनावरंही उपोषणस्थळी आणली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासह आलेल्या इतर मंत्र्यांना चहासुद्धा मिळू शकला नाही.