Wednesday, December 1 2021 6:06 am
latest

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उद्या सुरुवात

यवतमाळ -:  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात उद्या (शुक्रवार) सकाळी आठला ग्रंथदिंडीने होणार आहे. निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरला होता. समता मैदानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील साहित्यिकांची मांदियाळी राहणार आहे.
संमेलनात कविकट्टा, चर्चासत्र, परिसंवाद, वऱ्हाडी कविता, टॉक शो, काव्यवाचन, असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतील. साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. यात ग्रंथांच्या पालखीसह विविध संतदर्शन देखावे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर यांच्या जीवनदर्शनावरील देखावे, लेंगी नृत्य, गोंडी नृत्य, कोलामी नृत्य, अशा लोकसंस्कृतीवर समूहाचे सादरीकरण होईल. ज्येष्ठ कवयित्री, ललित लेखिका, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे या संमेलनाध्यक्ष आहेत. दुपारी चारला होणाऱ्या उद्‌घाटन कार्यक्रमाला मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाच्या हंगामी अध्यक्ष विद्या देवधर, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांची उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथदिंडीचा मार्ग पाच कंदील चौक, तहसील चौक, गोधणी रोड, अणे महिला महाविद्यालय, दत्त चौक, बसस्थानक चौक, गार्डन रोड, एलआयसी चौक, समता मैदान असा निश्‍चित करण्यात आला आहे. ग्रंथदिंडीच्या मार्गावर नगर भवन, शहर पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, रेडक्रॉस भवन व काही खासगी भिंतींवर प्रसिद्घ कवींची काव्यचित्रे रंगविण्यात आली आहेत.
तब्बल 45 वर्षांनंतर यवतमाळात होणारे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी 300 स्वयंसेवकांचे हात राबत आहेत. सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय आणि प्रतिसाद फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांचा यात समावेश आहे. पाहुण्यांची विनम्रपणे मदत, शिस्तपालन, गैरसोय होणार नाही, याची काळजी स्वयंसेवक घेणार आहेत