Wednesday, March 26 2025 4:02 pm

GYAN थीमवर सादर होणार अर्थसंकल्प २०२४

नवी दिल्ली, 15 : नवीन वर्ष उजाडताच उद्योजकांपासून ते सर्वसामान्यांना वेध लागतात ते फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे. यंदा एक फेब्रुवारीला मोदी सरकार संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्र सरकार GYAN थीमवर अर्थसंकल्प सादर करेल, असं म्हटलं जात आहे. GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता, नारी, या घटकांना केंद्रित करत मोदी सरकार हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करेल. या चार गटांना खुश करण्यासाठी या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान लोकसभेचा (Lok Sabha) कार्यकाळ १६ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने यावेळच्या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. लोकसंख्येचा अर्थसंकल्प सादर करून सरकारही जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात सर्वप्रथम आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एकाच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ लक्षात घेता यावेळच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना अनेक देशांतर्गत उत्पादनांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत. महिला आणि गरजू जमातींसाठी विशेष घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय सरकार पीएम किसान सन्मान निधी वाढवू शकते. सरकारने एनपीएसवर नवी योजना तयार केलीय. या योजनेवर विविध घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेचे अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत चालेल.

हा अर्थसंकल्प (Budget)लोकसभा निवडणुकांच्याआधी सादर होणार आहे. यामुळे सरकार विशेषकरून मध्यमवर्गातील वेतनधारी नागरिकांवर लक्ष केंद्रीत करू शकते. अर्थसंकल्पात गृहकर्जावरील आयकर सवलतीत वाढ होण्याची शक्यता. यावेळच्या अर्थसंकल्पात सरकार गृहकर्जावरील आयकर सवलतीची (home loan income tax) व्याप्ती ५ लाखांवरून ७ लाखांपर्यंत वाढवू शकते, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. यावर्षी निवडणुका आहेत, त्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं विशेष लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांनाही मोठ्या अपेक्षा आहेत. रिअल इस्टेट (real estate) क्षेत्रही मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत.