ठाणे,08 – ठाणे जिल्हा प्रशासनाने गेल्या सात दिवसांपासून राबविलेल्या महसूल सप्ताहाची सांगता 17 तरुणांना तलाठी पदावर व एका जणास शिपाई पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. यावेळी महसूल सप्ताहात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
महसूल विभागाच्या वतीने दि. 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध दाखले वाटप, युवा संवाद अंतर्गत युवकांपर्यंत महसूलच्या सेवा पोहोचविणे, नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व सेवा देण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम, माजी सैनिकांसाठी सैनिकहो तुमच्यासाठी, माजी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी संवाद कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील विविध तालुक्यात करण्यात आले.
या सप्ताहाची सांगता आज अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिमाखात कार्यक्रमात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, राजू थोटे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार युवराज बांगर, अधिक पाटील, राहुल सारंग, प्रशांती माने, संजय भोसले, नीलिमा सूर्यवंशी, अपर नायब तहसिलदार अभय गायकवाड हे उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातून बदली झालेले जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे, नायब तहसिलदार मृणाल कदम, राजश्री पेडणेकर यांना निरोप देण्यात आला. तर जिल्ह्यात नवीन नियुक्त झालेले जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, तहसिलदार संजय भोसले, राहुल सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा तत्वावर केलेल्या नियुक्त्यांचे प्रमाणपत्र वाटपही यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे म्हणाल्या की, महसूल विभाग हा वर्षभर विविध प्रकारची कामे करीत असतो. मात्र, या कामांची दखल या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने घेतली जात आहे. महसूल विभागाशिवाय शासनाचे कोणतेही काम पूर्ण होत नाही. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने अल्पसंख्यांक महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींपर्यंत महसूलचे काम पोहोचविले तसेच मुरबाडसारख्या दूर्गम भागातही महसूल विभागाचे काम पोहोचविण्यात यश मिळाले आहे. प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपण गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची नोंद ठेवावी. तसेच प्रत्येकाने एक संघ म्हणून काम केले तर चांगले काम उभे राहू शकले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री.परदेशी म्हणाले की, ठाणे जिल्हा प्रशासनात काम करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी हा चांगले काम करत असतो. मात्र, हे काम लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, हे या सप्ताहात आढळून आले. जिल्हा प्रशासनातील सर्वस्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनुकंपा नियुक्तीचे चांगले काम केले आहे. तसेच युद्धभूमीत वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांच्या वीरपत्नींना महसूल सप्ताहानिमित्त जमिनीचे वाटप करण्यात आले. हा एक समाधान देणारा कार्यक्रम ठरला आहे. महसूल सप्ताहाचे जिल्ह्यात उत्कृष्ट नियोजनबद्ध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.गजरे, जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप, नायब तहसिलदार श्री. पैठणकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
महसूल सप्ताहाच्या या आगळ्या-वेगळ्या सांगता कार्यक्रमाचे दिलखुलास सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले.