Friday, January 17 2025 6:13 am
latest

6 व 7 मार्च रोजी ठाण्यात होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात बेरोजगार युवक सहभागी होतील यासाठी सर्व यंत्रणांनी कसोशीने प्रयत्न करावेत : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार मेळावा”

6 व 7 मार्च रोजी ठाणे येथे होणार

ठाणे 01 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय कोकण ‘नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचे’ आयोजन दि. 6 व 7 मार्च 2024 रोजी मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट ,चेक नाका, ठाणे येथे होणार असून या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळेल या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कसून प्रयत्न करावेत, यासाठी मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या युवकांपर्यत पोहचण्यासाठी कॉल सेंटर्सच्या माध्यमातून संवाद साधावा अशा सूचना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिल्या.

ठाणे येथे दि. 6 व 7 मार्च 2024 रोजी होत असलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचा आढावा आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिकेत झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी महापालिका आयुक्‌त श्री. अभिजीत बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांच्यासह तहसीलदार, जिल्हा कौशल्य विभाग, तसेच विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा नमो महारोजगार मेळावा ठाणे येथे होत आहे. या महारोजगार मेळाव्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळेल या दृष्टीने सर्वांनी काम करावयाचे असून त्यासाठी नोंदणी करीत असलेल्या युवकांशी कॉलसेंटरच्या माध्यमातून संपर्क साधावा. तसेच पालघर जिल्ह्यातील युवक युवती मोठ्या प्रमाणात या मेळाव्यास सहभागी होतील या दृष्टीने तेथील यंत्रणांशी संपर्क साधावा, जेणेकरुन जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यात युवक सहभागी होतील असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील आयोजन करण्यात आले असून ६ व ७ मार्च रोजी हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स,इनवेस्टर्स व इनकुबेटर्स या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

या मेळाव्यात दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जावून उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देता येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयीन तरूण तरूणींना यात सहभागी होता यावे यासाठी महाविद्यालयांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही खासदार शिंदे यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 -120 -8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.