प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरी उत्साहात संपन्न
ठाणे, 30 – प्रो गोविंदा सीझन २ ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील १६ संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, मुंबई टी २० लीग चेअरमन विहंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मजहर नाडियावाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील स्व. बाबुराव जिम्नॅस्टिक सेंटर येथे संपन्न झाली.
एकूण ३२ संघ पूर्व पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत. श्री आगरेश्वर गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, अजिंक्यतारा गोविंदा पथक, खोपटचा राजा गोविंदा पथक, मरीआई मेटपाडा गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, ओम ज्ञानदीप मंडळ, ओम साई माऊली गोविंदा पथक, हिंदु एकता दहीहंडी पथक, श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ, हिंदमाता गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, साईराम गोविंदा पथक, आई चिखलदेवी गोविंदा प्रतिष्ठान, कोकण नगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्व पात्रता फेरी आज संपन्न झाली. उर्वरित १६ संघांची पूर्व पात्रता फेरी रविवारी दिनांक २८ जुलै, २०२४ रोजी होणार आहे. या फेरीतून अंतिम फेरीसाठी १६ संघ निवडण्यात येतील. अंतिम फेरी दि. १८ ऑगस्ट, २०२४ रोजी वरळीतील NSCI डोम येथे होणार आहे.
आज झालेल्या पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचा अद्भूतपूर्व खेळ अनुभवण्यास मिळला. गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणे व या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते, असे प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कबड्डी, क्रिकेटप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे, खेळामधील सुरक्षितता वाढवणे तसेच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे.