Tuesday, December 10 2024 8:35 am

अवघ्या २४ तासाच्या आत बॅनर झाले गायब

ठाणे,6 : लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेचे नरेश म्हस्के विजयी झाले आणि राजन विचारे यांचा पराभव झाला. महापालिका मुख्यालयाजवळ भाजप आणि मित्र पक्षाने म्हस्के यांच्या संदर्भात लावलेल्या बॅनरने वेगळीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या बॅनरवर आमचे मित्र दिसणार नाहीत ठाणे महापालिकेत ते आता बसणार थेट संसदेत, ठाण्याचा उंबरठा ओलंडण्यासाठी त्यांना शुभेच्छा. असा काहीसा आशय त्या बॅनरवर आहे. या बॅनरचा अर्थ आता ठाणे महापालिकेत लक्ष देऊ नका दिल्लीकडे लक्ष द्या असेच काहीसे सांगण्याचा प्रयत्न तर त्यांच्या सहका-यांनी केला नाही ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. परंतु बुधवारी सांयकाळी लावण्यात आलेला हा बॅनर अवघ्या २४ तासाच्या आत काढण्यात आला आहे.

ठाणे लोकसभेचा निकाल लागला आणि नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा २ लाख १७ हजार ३ मतांना पराभव केला. त्यानंतर ठाण्याच्या विविध भागात म्हस्के यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकू लागले आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आभार मानले आहेत. त्यासाठी त्यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होत आहे. एक चहावाला पंतप्रधान होतो , एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता ‘ खासदार ‘ झाला आहे, हा आहे नवा ‘हिंदुस्थान’, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनधी झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकत्यार्ला ही संधी मिळाली, असेही त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे राजन विचारे यांचा देखील चंदनवाडी शाखेजवळ एक बॅनर झळकला आहे, त्यात गड आला पण सिंह गेला असे त्यात म्हंटले आहे. त्यामुळे या बॅनरची देखील चर्चा सुरु आहे.
परंतु महापालिका मुख्यालयाजवळ लागलेल्या बॅनरवरुन वेगळ्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नरेश म्हस्के विजयी झाल्याबद्दल हा बॅनर लावण्यात आला आहे. त्यात भाजप आणि शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या बॅनरवर आमचे मित्र दिसणार नाहीत ठाणे महापालिकेत ते आता बसणार थेट संसदेत, ठाण्याचा उंबरठा ओलंडण्यासाठी त्यांना शुभेच्छा. असा काहीसा आशय त्या बॅनरवर आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के विषयी सांगताना आता महापालिकेकडे लक्ष देऊ नका, दिल्लीकडे लक्ष द्या असे सुचक विधान केले होते. त्यात आता लागलेल्या बॅनरवर देखील तशाच प्रकारचा आशय आल्याने माझी नगरसेवकांनी नेमके काय म्हणायचे हे त्यातून अधोरेखीत होत आहे. त्यामुळे या बॅनरची चर्चा शहरात सुरु असतांनाच अवघ्या काही तासातच हे बॅनर गायब झाले आहे. आता हे बॅनर कोणी काढले, किंवा काढायला लावले याचा शोध भाजपची मंडळी घेऊ लागली आहे.