Thursday, December 5 2024 5:55 am

माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न

वरळीतील 100 महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई 08 :- उबाठा गटाचे माजी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दोघांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, बबनराव घोलप हे पक्षातील जुने नाही जाणते नेते आहेत, यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना कुठल्याही मागणी शिवाय पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ते राष्ट्रीय चर्मकार समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. चर्मकार समाजाला न्याय देण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन यापुढे त्यांना पक्षात राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची जबाबदारी देण्यात येईल असे जाहीर केले.

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, महिला भगिनी आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे मत व्यक्त केले. आगामी लोकसभा निवडणुकांमध्येही सरकारतर्फे केलेल्या कामांची माहिती देऊनच मते मागणार असल्याचे मत यावेळी शिंदे यांनी सांगितले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकाळजे गटाचे भाऊसाहेब पगारे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि वरळी विधानसभा मतदारसंघातील शंभर महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
तसेच ‘एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे यावेळी जाहीर केले.

यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, एमएसआरडिसी मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.