Thursday, December 5 2024 6:13 am

चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी 9 नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यात रंगीत तालीम

जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील गावांचा समावेश

ठाणे, 2 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने येत्या 9 नोव्हेंबर 2023 रोजी चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी कोकण किनारपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम होणार आहे. राज्यस्तरीय रंगीत तालीममध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गावाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे.
चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन रंगीत तालीमविषयी माहिती दिली. दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ, तहसिलदार संजय भोसले, अंबरनाथच्या तहसिलदार प्रशांती माने आदींसह जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल, आपदग्रस्तांना वाचविण्यासाठी काय तयारी केली जाणार आहे, आपदग्रस्तांची कशा प्रकारे सुटका करणार आहे, आपत्तीच्या अनुषंगाने करण्यात येणारे उपाय योजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतरण, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींची तयारी याबाबत रंगीत तालीम होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील तीन गावांमध्ये ही रंगीत तालीम होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्वच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. केंद्रीय स्तरावरून या रंगीत तालीमचे बारकाईने निरीक्षण करण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी यात गांभीर्याने सहभागी व्हावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री.परदेशी यांनी यावेळी दिल्या.