Tuesday, June 2 2020 3:59 am

28 फेब्रुवारीनंतर तुमचं मोबाईल वॉलेट बंद होणार

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. पण आता यावर ब्रेक लागू शकतो. कारण, रिझर्व बँकेच्या नव्या आदेशामुळे 28 फेब्रुवारीनंतर मोबाईल वॉलेट बंद होण्याची शक्यता आहे.मीडिया रिपोर्टनुसार, रिझर्व बँकेने देशातील परवानाधारक मोबाईल वॉलेट कंपन्यांना आपल्या ग्राहकांकडून eKYC भरुन घेण्याचे आदेश दिले आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी बँकेने 28 फेब्रुवारी 2018 पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे ज्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांचे eKYC भरुन घेतले नसेल, त्या सर्व ग्रहकांचे मोबाईल वॉलेट बंद होण्याची शक्यता आहे.दरम्यान, सध्या देशभरातील नऊ टक्क्यांपेक्षा कमी मोबाईल वॉलेट यूजर्सनी eKYC भरलं आहे. तर उर्वरित 91 टक्के ग्राहकांचे eKYC व्हेरिफिकेशन बाकी आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर त्यांचं मोबाईल वॉलेट बंद होऊ शकते.रिझर्व बँकेच्या आदेशानंतर पेटीएम, एअरटेल मनी, फ्रीचार्ज, मोबीक्विकसारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांना eKYC भरण्याचं आवाहन करत आहेत. या प्रक्रियेत ग्राहकांना आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लिंक करायचे आहे. eKYC पूर्ण केल्यानंतर संबंधित ग्राहकाचं मोबाईल वॉलेट सुरक्षित राहणार आहे.

मोबाईल वॉलेट सुरक्षित करण्यासाठी काय कराल?

सध्या सर्व कंपन्यांनी आपल्या मोबाईल अॅपवर केवायसीचा ऑप्शन दिला आहे.

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर किंवा पॅन नंबर लिंक करावा लागेल.

यानंतर तुमच्या जवळच्या सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती दिली जाईल. जिथे तुमचं आधार कार्ड दाखवून थम्ब इम्र्पेशन दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचं मोबाईल वॉलेट सुरक्षित होईल.