Wednesday, August 12 2020 9:19 am

कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी उभारण्यात आलेला मंच आणि खुर्च्या पाहून गणेश नाईक यांना राग अनावर झाला

नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांनी बुधवारी (10 जून) वाशी येथील कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी उभारण्यात आलेला मंच आणि खुर्च्या पाहून गणेश नाईक यांना राग अनावर झाला. त्यांनी संतापात नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना फोन करत याबाबत जाब विचारला

गणेश नाईक यांनी कॅमेरासमोर आयुक्तांशी फोनवर संभाषण केलं. यावेळी ते आयुक्तांवर भडकले. पुढच्या आठ दिवसात वाशीचं हॉस्पिटल जनरल हॉस्पिटल नाही झालं तर महापालिका आयुक्तांना घेराव घालणार, असा इशारा गणेश नाईक यांनी यावेळी दिला.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोविड सेंटर उद्घाटनासाठी थांबलं आहे का? विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत उद्घाटनाचे विचार येतात तरी कसे? उद्घाटनासाठी खुर्च्या लागल्या आहेत. स्टेज बनत आहेत, उद्घाटनाचा विषयच नाही?

कोरोनामुळे लोकं मरत आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही तुम्हाला उद्घाटनाची पडली आहे? उद्घाटनाचं सुचतं कुणाला? तुम्ही हे सर्व बंद करा. उद्या तातडीने सर्व पेशंट इकडे शिफ्ट करा. लोकांची सोय करा. कोरोनामुळे लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे लोकांवर उपचार करा. त्यानंतर तुम्ही उद्घाटन करा.

पुढच्या आठ दिवसात वाशीचं हॉस्पिटल जनरल हॉस्पिटल नाही झालं, तर मी तुमच्याजवळ येऊन घेरावा घालणार. तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळू नका. पावसाळा सुरु झाला आहे. साथीचे रोग चालू होतील. त्यावेळी लोकांना खासगी हॉस्पिटल परवडणार नाही. त्यामुळे तुम्ही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बसवा.

उद्घाटनाचं ज्यांना सूचलं त्यांना सांगा, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकं मरत आहेत. तरी उद्घाटन कसं सुचतं तुम्हाला? उद्घाटन रद्द करा, नाहीतर मी याविरोधात निदर्शनं देईल.