Sunday, July 5 2020 10:19 am

102 वर्षाच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजाराबाबत नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणू हा ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह असणाऱ्या नागरिकांना जास्त प्रमाणात आक्रमण करतो त्यामुळे त्यांना त्याची लागण झाल्यानंतर आपण बरे होऊ का नाही असा प्रश्न ज्येष्ठांना सतावू लागला आहे. असे असतांना, दुसरीकडे ठाण्यातील कौशल्य रुग्णालयात एका 102 वर्षाच्या आजोबांची इच्छाशक्तीच्या जोरावर व डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या योग्य उपचारामुळे कोरोनावर यशस्वी मात करीत घरी परतले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना, दुसरीकडे या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातून नुकतेच 100 वर्षाची आजीबाईसह 91 आणि 85 वर्षाच्या महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात सोमवारी ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव खोपट परिसरात राहणाऱ्या 102 वर्षाच्या इसमाने जवळपास एक महिन्याच्या उपचारानंतर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.
ठाण्यातील खोपट सिद्धेश्वर तलाव परिसरात 102 वर्षीच्या वयोवृद्ध इसमाला त्रास होवू लागल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा कोविड अहवाल आल्यानंतर त्यांना 2 जून रोजी कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर उपचार करीत असतांना, त्यांना निमोनिया असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना अतिदक्षत विभागात ठेवण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयाचे विश्वस्त, डॉ. अमोल भानुशाली आणि डॉ. समीप सोहोनी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित लाला खोमाने, डॉ. संतोष द्विवेदी यांच्या पथकाने अथक परिश्रम घेतल आणि अखेर 103 वर्षाच्या आजोबांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना विरुद्धची लढाई जिंकली. सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.