Friday, August 6 2021 9:02 am

३० नोव्हेंबर पर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार – मोदी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्वच लहान मोठ्या उद्योगांवर विपरीत परिणाम झाला असून सर्वच स्तरावरील नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे.आपण कोरोनाशी लढताना आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहोत. अशात पावसाळा आला आहे तेव्हा स्वतःची काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतातली परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र आता अनलॉक २ सुरु करताना आपल्याला अधिक काळजी घ्यायची आहे. निष्काळजीपणा करु नका असंही त्यांनी सांगितलं आहे.विडिओ च्या माध्यमातून त्यांनी आज देशाशी संवाद साधला.

अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. हे योग्य नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर अत्यंत गांभीर्याने नियमांचं पालन करण्यात आलं. आता पुन्हा एकदा राज्य सरकारांना, देशाच्या नागरिकांना आणि संस्थांना अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जे करदाते आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा कर भरला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असंही मोदींनी म्हटलं आहे.