ठाणे, ०४ : गावदेवी मैदान येथिल तीन इमारती धोकादायक झाल्याने ठाणे महापालिकेकडून तोडण्यात आल्या. त्यामुळे सुमारे २७ वर्षे हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेल्या सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मालकी हक्काची घरे मिळाली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या कामगारांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांची सुमारे ७२ कुटुंबे गावदेवी मैदान येथील तीन इमारतींमध्ये राहत होती. या इमारती धोकादायक झाल्याने १९९५ साली तोडण्यात आल्या. सफाई कामगारांना १८ महिन्यात मालकी हक्काची घरे देण्याबाबत त्यावेळी लेखी करार करण्यात आला होता. नियोजित वेळेत घरे न मिळाल्याने २००८ साली कामगारांनी उपोषण केले, त्यावेळी महापालिकेने ५० टक्के घरभाडे माफ करून वेळ मारून नेली. त्यानंतर पुन्हा कामगारांनी २०११ साली उपोषण केले. अखेर या कामगारांनी २०१९ साली भगवान बारिया, भीमडा बारिया, रवी राठोड, सनी दाठीया, सोमजी जेठवा आदी कामगारांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.
आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या कामगारांची कैफियत मांडून तातडीने घरे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ११ जुलै २०२२ रोजी सफाई कामगारांना धर्मवीर नगर येथील सोयी-सुविधांनी युक्त इमारतीमधील घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
तब्बल २७ वर्षांनी मालकी हक्काची घरे मिळाल्याने या कामगारांच्या कुटुंबांनी दिवाळी साजरी केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी आमदार संजय केळकर यांचा भव्य सत्कार या कुटुंबांनी करून कृतज्ञता व्यक्त केली. आम्हाला घरे मिळावीत म्हणून आम्ही अनेक नेत्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले. अखेर आमदार संजय केळकर यांनी आम्हाला हक्काची घरे मिळवून दिली. आम्हीच नाही तर आमच्या पुढील पिढ्याही त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगतील, अशा भावना भगवान बारिया यांनी व्यक्त केल्या.