Friday, May 24 2019 9:36 am

२७ गावांमध्ये झोनिंग करून पूर्ण दाबाने पाणीपुरवठा एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांचे आदेश

·        आठवडाभरात कार्यवाही न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

·        १.५ केजी दाब कायम ठेवून पाणीपुरवठा करण्याचे आदेश

·        २७ गावांची पाणीटंचाई दूर होणार

 

मुंबई – कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी झोन करून त्यानुसार वेळापत्रक ठरवावे आणि १.५ केजी इतका दाब कायम ठेवून पाणीपुरवठा करावाजेणेकरून सर्व गावांमध्ये पूर्ण दाबाने ठरलेल्या वेळेत पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी एमआयडीसीला दिले. पुढील आठवड्यात श्री. महाजन आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत पुन्हा आढावा बैठक घेण्यात येऊन आठवड्याभरात झोनिंगची कार्यवाही न केल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. शिंदे यांनी यावेळी दिला.

२७ गावांमधील पाणीटंचाईसंदर्भात मंगळवारी पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या पुढाकाराने विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, गणपत गायकवाड, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, एमआयडीसीचे मुख्य अभियंते श्री. सोनजे, कार्यकारी अभियंते, श्री. पंडित, श्री. ननावरे, केडीएमसीचे जल अभियंते श्री. कोलते आदी उपस्थित होते.

एमआयडीसीने जलसंपदा विभागाकडे १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उचलण्याची परवानगी मागितली आहे. परंतु, ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्र धरणात सध्या १२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून जुलैपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पाणीपुरवठ्यात वाढ करता येणे शक्य होणार नाही, असे बैठकीत सांगण्यात आले. त्यावर पालकमंत्री श्री. शिंदे यांनी हस्तक्षेप करत, सर्व विभागांना पूर्ण दाबाने निश्चित वेळेत पाणीपुरवठा झाला तर पाणीटंचाईच्या तक्रारी उद्भवणार नाहीत, असे सांगितले आणि झोनिंग करून सर्व विभागांना झोननुसार १.५ केजी इतक्या दाबाने पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही यासंदर्भात बैठकीतूनच फोनवर चर्चा केली.

दिव्यासाठी वाढीव पुरवठ्यासाठी कार्यवाही

दिवा, शीळ, देसाई परिसराला २० एमएलडी अतिरिक्त पाणी देण्याची मागणी मे २०१६ मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. त्यापैकी १० एमएलडी पाणी तातडीने वाढवून देण्यात आले होते; तर उर्वरित १० एमएलडी पाणी पावसाळ्यानंतर वाढवून मिळणार होते. मात्र, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही हे पाणी मिळाले नसल्याची बाब ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी बैठकीत मांडली. त्यावर, यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.