Monday, April 6 2020 12:46 pm

२७ गावांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या २७ गावांचे नगर परिषदेत रूपांतर करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करू असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या एका बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

विधानसभा सदस्य प्रमोद पाटील,  गणेश नाईक आणि गणपत गायकवाड यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या २७ गावांसंदर्भातील प्राप्त हरकती आणि सूचनाबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. विभागीय आयुक्तांचा हा अहवाल मिळाल्यानंतर याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईलअसे त्यांनी  स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार यापूर्वी नगरविकास मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात २७ गाव संघर्ष कृती समितीच्या सदस्यासोबत एक बैठक पार पडली होती. त्यावेळी याबाबत  लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे माननीय नगरविकास मंत्र्यांनी कृती समितीच्या सदस्यांना सांगितले होते. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार आहे.

लक्षवेधीला उत्तर देताना या २७ गावांतील नागरिकांना न्याय देण्यासाठी नगर परिषदेची स्थापना लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील राहू असेही नगरविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग –

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग प्रस्तावित असल्याची माहितीही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्‍नोत्तराच्या दरम्यान दिली.

या बोगद्यासह जोड रस्त्यांच्या प्रकल्पाचा पूर्व सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आले आहेत. त्यांनी सुचवलेल्या अंतिम आखणीची पाहणीही करण्यात आली असूनत्यास शासन स्तरावरून पायाभूत सुविधा समितीची मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.