०४ जुलै,२०२२ पूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन
ठाणे (२२): नागरिकांच्या वैयक्तीक तक्रारींचा निपटारा तातडीने व्हावा यासाठी तालुका स्तरिय लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर महिन्याच्या तिस-या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले असून, दिनांक १८ जुलै, २०२२ रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी १५ दिवस आधी दिनांक ०४ जुलै,२०२२ पूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी आपली निवेदने खालील ठिकाणी सादर करावीत.
परिमंडळ-१ (कळवा, मुंब्रा, दिवा प्रभाग समिती अंतर्गत)
उपायुक्त कार्यालय, कळवा प्रभाग समिती कार्यालय, कळवा
परिमंडळ-२ (नौपाडा, वागळे प्रभाग समिती अंतर्गत)
उपायुक्त कार्यालय, नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे (प.)
परिमंडळ-३ (उथळसर, वर्तकनगर, लोकमान्य-सावरकरनगर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत) उपायुक्त कार्यालय, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे (प.)
नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार १५ दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. तरी नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने त्या त्या परिमंडळ कार्यालयात सादर करावीत.
अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी, एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक, विविध न्यायालयात, लोकआयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे, तसेच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या, संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अर्ज स्विकारला जाणार नाही. लोकशाही दिनामध्ये अन्य व्यक्तींमार्फत केलेली तक्रार स्विकारली जाणार नाही. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येण्याची आवश्यकता नाही.