Monday, April 19 2021 12:08 am

हृदयद्रावक! स्वतःचं चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून केली विनाअनुदानित शिक्षकाने आत्महत्त्या..

पालघर : जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथील एका कला शिक्षकाने स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आपल्या फोटोला हार घालून गळफास घेऊन घरातच आत्महत्त्या केली.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एकतीस वर्षीय तरुण चित्रकला शिक्षक गंगाराम रमेश चौधरी यांनी आपलं स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आपल्या फोटोला हार घालून गळफास घेऊन घरातच आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.

काही दिवसापासून आपली पत्नी लग्न होऊन ५ वर्ष झाली तरीही वेतन मिळत नाही म्हणून माहेरी निघून गेल्याने गंगाराम विचलित अवस्थेत होता. गंगाराम हा चित्रकलेत पारंगत आणि वारली चित्रकार होता. 8 जून 2020 रोजी गंगारामने आपले स्वतःचे चित्र रेखाटले. त्या चित्रावर दि 15-7-2020 बुधवार, असा मृत्यू दिनांक टाकला. आणि चित्राला हार घालून त्याचा फोटो काढून त्यांच्या एक आप्तेष्टाला व्हॉटअप्सद्वारे फोटो पाठवला.

सध्या पाऊस चांगला असल्याने शेतीची काम सुरू आहेत. त्यामुळे काल गंगारामच्या घरातील सर्व माणसं आपल्या भात लावणीच्या कामासाठी शेतीवर निघून गेली होती. दरम्यान गंगाराम एकटाच घरी होता. त्याने घरातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत विनाअनुदानित शाळेवर चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न 2016 साली झाले होते.

नैराश्य वाढतंय
कोरोना व्हायरसमुळे सर्वांनाच लॉकडाऊन अनिवार्य झाले आहे. मात्र, लॉकडाऊनमधील क्वॉरंटाईन हे मानसिक आरोग्यवर परिणाम करत असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विनाअनुदानीत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांचीही अशीच काहीशी अवस्था झाली आहे. घरात बसून राहावे लागत असल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढत असल्याचे सांगितले आहेत.