ठाणे 18 – ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ठाण्यात दाखल झालेली ‘ हिंद अयान’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकल स्पर्धा आज ठाणे महापालिका भवन येथून मुंबईकडे रवाना झाली. यावेळी उपायुक्त मिनल पालांडे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देवून स्पर्धेस झेंडा दाखविला.
यावेळी उपायुक्त अनघा कदम, तरणतलाव व्यवस्थापक रिमा देवरूखकर तसेच आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन, स्वत्व फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या काजुवाडी शाळेतील विद्यार्थी तसेच पाचपाखाडी येथील सरस्वती एज्युकेशन स्कूल व क्रिएटिव्ह स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच, भारतीय सायकलिंग संघांना देशातच सराव करण्याची संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंद अयान, या बहुस्तरीय सायकलिंग शर्यत पाच फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरू झाली.
दिल्ली-आग्रा-जयपूर-भिलवाडा-उदयपूर-गांधीनगरमार्गे ती १६ फेब्रुवारीला ठाण्यात पोहचली. आज सकाळी ७.०० वा. ही शर्यत ठाण्याहून मुंबईला रवाना झाली. या प्रवासात ठाणे, मुंबईतील सायकलपटू ठाणे महापालिका ते मुंबई महापालिका या जॉय राइडमध्ये सहभागी झाले होते.
‘हिंद अयान’ हे ५० सायकलपटूंचे पथक आहे. ठाण्यात दाखल झालेल्या या सायकलपटूंनी शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) ठाणे शहरातील शाळा आणि हेरिटेज वास्तूंना भेटी दिल्या. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन, ‘स्वत्व फाउंडेशन या हौशी संस्थेचे सायकलपटूही सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण तसेच, युवक कार्यक्रम व खेळ विभाग यांनी मान्यता दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने लष्कर आणि नौदलाचे जवान पाठवले आहेत .सध्या भारतात लांब पल्ल्याच्या सायकलिंगची शर्यत नाही. त्यामुळे ऑलिम्पिक संघ, राष्ट्रीय सायकलिंग संघ, पोलीस आणि सैन्यातील सायकल पटूंना लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये भाग घेण्यासाठी परदेशात जावे लागते. म्हणूनच, सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील सायकलिंग संघांना सराव करण्याची संधी देण्यासाठी, ‘ हिंद अयान ’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित करण्यात आली असल्याचे शर्यतीचे आयोजक आणि पाच खंडांतील ३५ देशांमधून फिरून संपूर्ण जगाला प्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय सायकलपटू विष्णुदास चापके यांनी नमूद केले.
ठाणे ते मुंबई असा प्रवास करून १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी पुण्यात या शर्यतीची सांगता होणार आहे.