Monday, April 6 2020 2:53 pm

हिंगणघाट पीडितेच्या संघर्षाचा शेवट, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. आज  सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी  रात्रीपासून तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

हिंगणघाट इथे 3 फेब्रुवारी रोजी विकेश नगराळे या नराधमाने पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी सकाळी कॉलेजमध्ये जात असताना नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर आलेल्या आरोपी विकी नगराळेने तिच्यावर पेट्रोल फेकलं आणि तिच्या हातात पेटवलेला टेंभा फेकून तिला पेटवून दिलं. त्यानंतर लगेचच त्याने घटनास्थळवरुन पळ काढला. युवतीने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले. त्यानंतर तिच्यावर जवळील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आणि नंतर तिला नागपूरच्या ऑरेंज रुग्णालयात दाखल केलं.

या सात दिवसांमध्ये तिच्यावर दोन ते तीन वेळा शस्त्रक्रियाही झाल्या. परंतु कालपासून तिची प्रकृची अतिशय खालावली होती. रक्तदाब तसंच हृदयाचे ठोके कमी झाले होते. श्वासोच्छवास घेण्यासही तिला त्रास होत होता. शिवाय रात्रीपासून तिला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले आणि त्यातच तिने प्राण सोडले. तिला आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत घोषित केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं ..परंतु गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी पीडितेच्या वडिलांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली. हिंगणघाटमधील पीडितेचा संघर्ष अखेर थांबला असून शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.