कोल्हापूर 12 : हातकणंगले नगरपंचायत येथे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या ‘शिवराज्य भवन’ या बहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हातकणंगले नगरपंचायत क्षेत्रात 2 हजार 600 चौरस मीटर जागेत उभारण्यात येणाऱ्या या शिवराज्य भवन बहुउद्देशीय सदनाचा वापर परिसंवाद, कार्यशाळा, योग प्रशिक्षण, अभ्यासिका, शिबिर, लग्नसमारंभ, आध्यात्मिक प्रवचने अशा विविध कारणांसाठी करण्यात येणार आहे.
या इमारतीसमोर प्रवेश मार्गासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होणाऱ्या या इमारतीमध्ये स्वतंत्रपणे नियंत्रित वापरता येईल, अशा गेस्ट रुम, शयनगृहे प्रस्तावित आहेत. या इमारतीच्या वास्तू संकल्पनेतून विविध प्रकारे शिवराज्यामधील पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी सकल मराठा समाज तसेच अन्य संस्था, संघटना व नागरिकांनी दिलेली निवेदने स्वीकारली व अन्य निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयातील जनकल्याण कक्षाकडे स्वीकारण्याच्या सूचना दिल्या.