महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्यासाठी प्रचार सभा
परभणीत विकासकामांची पर्वणी साधण्यासाठी भरोसेंना विजयी करा
हिमायतनगर/परभणी 10 – दोन वर्षात सरकारने लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, ज्येष्ठांना वयोश्री योजना, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली. आम्ही जे बोलतो ते करतो हे दोन वर्षात दाखवून दिले आहे. पैनगंगा नदीवरील बॅरेजेस आणि सात पुलांना मंजुरी दिली, आता हदगाव आणि हिमायतनगरमध्ये एमआयडी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नांदेडमधील हिमायतनगर येथे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की ४० वर्षांपासून रखडलेले पैनगंगा नदीवरील ७ बॅरेजेस हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने सरकारने मंजूर केले, यामुळे येथील एक लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारे पैनगंगा नदीवरील ७ पूल मंजूर केले. वसंत सहकारी साखर कारखाना दोन वर्षापासून चालू केला असून येथील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
बाबूराव कदम गरिब शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे केवळ बाळासाहेबांमुळेच करु शकत होते. त्यांच्यानंतर जे कोण वारसा सांगत आहे त्यांना धनदांडगे पाहिजेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उबाठावर केली. बाबुरावला विधानसभेत पाठवले की हेमंत पाटील विधान परिषदेत असे दोन आमदार या मतदार संघाच्या विकासासाठी दिलेत, असे मुख्यमंत्री म्हणालेत. यावेळी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील, अनिल पाटील यांच्यासह अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
परभणीतील महायुती उमेदवार आनंद भरोसे यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की परभणीकरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी महायुतीने आनंद भरोसे यांना उमेदवारी दिली आहे. परभणीचा विकास जर्मनीप्रमाणे करायचा आहे जे पाहून जगभरातील लोकांना परभणीचा गर्व वाटला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. येत्या २० तारखेला तुम्हाला धनुष्यबाणाला मतदान करायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबाण काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, गहाण ठेवला होता तो आम्ही सोडवला. या धनुष्यबाणाची शान वाढवायची आहे. परभणीतील शेकडो सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला. कोरोना काळात आनंद भरोसेने पायाला भिंगरी लावून काम केले. काही लोक कडीकुलूप लावून घरात बसले होते. हात धुवा कोमट पाणी पिया असे सांगत होते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला.
परभणीत विकासकामांची पर्वणी साधण्यासाठी भरोसेंवर विश्वास दाखवायला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.शेतकऱ्यांचे ७.५ एचपी वीज पंपाचे वीज बिल माफ केले. दहा आश्वासनांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यावर विरोधक टीका करत होते. मात्र बँक खात्यात पैसे जमा झाले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. बहिणींना १५०० रुपयांचे २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. बहिणींना लखपती करायचे असल्याचे ते म्हणाले. आपल्या योजना चोरायच्या आणि वचननामा बनवायचा ही राज्यातील पहिलीच घटना आहे. विरोधकांची पंचसुत्री म्हणजे थापा सुत्री आहे, असा टोला त्यांनी लगावला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना १५०० रुपयांची किंमत नाही कळणार, असे ते म्हणाले. लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. विरोधीपक्ष बोलतोय या योजनांची चौकशी लावू आणि दोषींना जेलमध्ये टाकू, यावर मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जावे लागले तर एकदा नाही तर शंभरदा जेलमध्ये जायला पर्वा करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.