Tuesday, December 10 2024 8:37 am

स्वीप उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात मतदार जनजागृती

सांगली, 15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाची तारीख अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमातून सर्व घटकांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गावोगावी जनजागृतीचे विविध उपक्रम घेऊन मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.

मतदार जनजागृती अभियानांतर्गत श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज, मिरज शहर व विटा येथे मॅरेथॉनच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस येथे बालहक्क सप्ताह व मतदार जनजागृती अभियानांतर्गत सह दिवाणी न्यायाधीश ए. वाय. खान यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना मतदान करण्यास सांगण्याबाबत आवाहन केले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालय येथे मतदान शपथ वाचन कार्यक्रम घेण्यात आला. तर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन यांच्या उपस्थितीत सुंदरनगर येथील वारांगनांनी मतदार शपथ घेत 100 टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

राजे रामराव महाविद्यालय, जत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जत शहरांमध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड किर्लोस्करवाडी कारखान्यातील 500 पेक्षा जास्त कामगारांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. आदर्श प्राथमिक विद्यामंदिर विटा व बिंदूताई महामुनी विद्यामंदिर विटा, दिघंची हायस्कूल दिघंची व आर एम कलाल कनिष्ठ महाविद्यालय दिघंची, जिल्हा परिषद शाळा आरवडे या ठिकाणी मानवी साखळीचे आयोजन करून मतदान जनजागृती करण्यात आली. चंपाबेन वाडिलाल ज्ञानमंदिर व पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जनजागृती पर मानवी साखळी साकारून सर्व पालक व नागरिकांना दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जत विधानसभा मतदारसंघात ऊसतोड कामगारांमध्ये उसाच्या फडात जाऊन स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात आली. एकता मोरे पाटील माध्यमिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज दिघंची येथे मानवी साखळीव्दारे वोट फॉर इंडिया चे आवाहन केले. श्री मुकुंदराज विद्यालय शाळगाव ता. कडेगाव व वांगी हायस्कूल येथे मतदाना संदर्भात संकल्प पत्र वाटप करण्यात आले. कोंडाबाई साळुंखे हायस्कूल हरिपूर येथे मतदार जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली.

न्यु इअर महिला बचत गट, आत्मशक्ती महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, प्रेरणा महिला बचत गटाच्या सदस्यांनी मतदानाची शपथ घेतली. शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायत, मौजे मांगले येथे महिलांनी मतदार जाणीवजागृती केली. निमसोड सर्व सेवा सहकारी लि., निमसोड येथे सभासदांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले.

खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदानकेंद्रामध्ये व त्या गावांमध्ये जेष्ठ मतदार, महिला मतदार, युवक मतदार यांच्याशी संवाद साधून, आवाहन पत्राचे वाटप करून मतदान जनजागृती करण्यात आली. लेंगरे, वाळूज, मादळ मुठी वेजेगांव येथे मतदान जनजागृती करण्यात आली. तासगाव तालुक्यातील आरवडे येथील मतदान केंद्र क्र.28 येथे महिला संवाद मेळावा व प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. पलूस तालुका डॉक्टर असोशियन पलूस,. निमा वूमन्स संघटना पलूस, आय एम आय संघटना यांच्या विद्यमाने श्री मंगल कार्यालय पलूस येथे मतदार जनजागृती करण्यात आली.