ठाणे, 15 – स्वामी विवेकानंद यांनी कालीमातेकडे प्रार्थना करताना ज्ञान दे, बुद्धी दे,वैराग्य दे असे मागणे मागितले होते. विवेकानंदाना स्वतःची ओळख कळली होती. अध्यात्म हेच जीवनकार्य असल्याचे त्यांना ओळख झाली. यामुळेच स्वामी विवेकानंद अध्यात्मिक गुरु होऊ शकले, स्वामी विवेकानंदांप्रमाणेच आयुष्यात काय करायचे ते समजायला हवे, त्यासाठी स्वतःची ओळख कळायला हवी तरच आयुष्यात यशस्वी होता येते असे मत ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.
आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनी, राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ यांचे ‘नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ बोलत होते. याप्रसंगी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. हर्षला लिखिते, सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे खजिनदार सतीश शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
वडिल वारले, काकाने घराबाहेर काढले, दोन बहिणी व आई यांना घेऊन दारोदार फिरत, नोकरी शोधत, बिकट आयुष्य जगत असताना आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांना भेटण्यासाठी विवेकानंद आले असताना परमहंसांनी, कालीमातेकडे आयुष्यातील सुख-समृध्दीसाठी प्रार्थना करण्याविषयी सुचविले. यानुसार विवेकानंदांनी साक्षात प्रसन्न झालेल्या कालीमातेकडे प्रार्थना करताना आयुष्यातील सुख-समृध्दी ऐवजी, मला ज्ञान दे, बुद्धी दे, वैराग्य दे असे मागणे मागितले. एकदा नाही अनेकदा, विवेकानंदांनी स्वतःच्या सुख-समृध्दी ऐवजी वारंवार वैराग्याची मागणी केली. विवेकानंदाना स्वतःची ओळख कळली होती. अध्यात्म हेच जीवनकार्य असल्याचे त्यांना ओळख झाली होती. यामुळेच स्वामी विवेकानंद अध्यात्मिक गुरु होऊ शकले. भारतभर भ्रमण करतांना विवेकानंदांचे अध्यात्मिक विचार पक्के झाले. यामुळेच अमेरिकेतील सर्वधर्मसभेतील आपल्या ११ भाषणांत स्वामी विवेकानंद, जागतिक सर्वधर्मसभेतील विद्धानांना, जगाला, खरा धर्म समजावू शकले. स्वामी विवेनंदांप्रमाणेच आयुष्यात काय करायचे ते समजायला हवे, त्यासाठी स्वतःची ओळख कळायला हवी तरच आयुष्यात यशस्वी होता येते. असे मत ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले. यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अजय ब्राम्हणे यांनी केले तर कार्यक्रमाचे वक्ते प्रा.डाॅ.प्रदीप ढवळ यांचा परिचय वैष्णवी सावंत या विद्यार्थिनीने करुन दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम खटकूळ व श्रावणी श्रेष्ठा या विद्यार्थ्यांनी केले.
चौकट
आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन, राष्ट्रीय सेवा योजना, कै. वामनराव ओक रक्तपेढी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आणि ८८ बाटल्या रक्त यावेळी जमा झाले, अशी माहिती प्राचार्य डाॅ. हर्षला लिखिते यांनी दिली. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक समन्वयक प्रा. विनायक जोशी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अजय ब्राम्हणे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. संजना भाबळ व प्रा. प्रसाद उर्मजी यांनी सहकार्य केले.