Wednesday, April 23 2025 12:56 am

वाचकांशी संवाद ही वृत्तपत्रांची ताकद- डॉ. मुणगेकर

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या विविध पुरस्कारांचे दिमाखात वितरण
मुंबई, 06 : लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची ठरते आणि वृत्तपत्र घडविण्यासाठी काम करणाऱ्या हातांचा गेल्या २३ वर्षापासून मराठी वृत्तपत्र लेखक संघ व एकनाथ बिरवटकर करत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू व अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले.
दादर येथे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहामध्ये आयोजित मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेचा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये डॉ. मुणगेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिका सिसिलिया कर्व्हालो, प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले, एक लेखक जेव्हा पुस्तक लिहितो, तेव्हा त्याचं पुस्तक एका वेळेला लेखक आणि वाचक असा संवाद सुरू असतो. याउलट वृत्तपत्र आणि वाचक यांचा संवाद तपासला असता एक वृत्तपत्र व हजारो, लाखो वाचक असा संवाद सुरू असतो, ही वृत्तपत्राची खरी ताकद आहे. सामान्य माणसाचा आवाज बनण्याचे काम वृत्तपत्रांनी आणखीन जबाबदारीने केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे म्हणाले, नागपूरमध्ये अधिवेशन असताना नागपूरच्या प्रश्नांवर चर्चा न होता अधिवेशन गुंडाळले जाते. विरोधी आमदारांना निधी दिला जात नाही. या विरुद्ध मी विधान भवनाच्या पत्रकार गॅलरीतून आवाज उठवला. विधान भवनात वागण्या- बोलण्याचे आणि काम करण्याचे संकेत आमदार पाळणार नसतील तर पत्रकारांनी तरी का पाळावे, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रभरातील पत्रकारांचा गौरव करण्याचा सुरू असलेला गौरवयज्ञ बिरवटकरांनी न थकता सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सिसिलिया कर्व्हालो म्हणाल्या, झाडाचे पान जेव्हा गळते तेव्हा त्याला झाडाची मूक संमती असते. या वाक्याचा अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या अर्थ काढला. एखाद्यावर अन्याय होत असेल आणि आपण तो शांतपणे पाहत असू तर आपलीसुद्धा त्या अन्यायाला मूक संमती आहे, असा त्याचा अर्थ होतो, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ. सुकृत खांडेकर म्हणाले, अशा वातावरणात वृत्तपत्रांनी जागल्याची भूमिका बजावून जनहिताच्या विचारांचा जागर करायला हवा. असे काम करणाऱ्या हातांचा गौरव बिरवटकर आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यांचे कार्य अनमोल आहे. संघाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार दैनिक तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांना तर कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक विकास अंत्रे यांना या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
पुरस्कारांमागची भूमिका मांडताना संघाचे अध्यक्ष बिरवटकर म्हणाले, समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या पत्रकार व संपादकांचा गौरव करण्यासाठी आम्ही पदरमोड करून हा सोहळा गेल्या २३ वर्षापासून चालविला आहे. अनेक अडचणी आल्या परंतु त्यावर मात करीत आम्ही लढतो आहोत. समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांच्या भल्यासाठी ही परंपरा अशीच सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देतांना किरण शेलार म्हणाले, जोपर्यंत वाचकांच्या मनातला आशय दिला जाईल तोपर्यंत वृत्तपत्रे टिकणार आहेत. या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढवली आहे. विकास अंत्रे म्हणाले, हा गौरव आमचा नसून खऱ्या अर्थाने वाचकांचा आहे. बिरवटकर आणि त्यांचे सहकारी अंधारातल्या दिव्यांना बळ देण्याचे करत असलेले काम लाखमोलाचे आहे. सूत्रसंचालन श्रीकांत चांडके यांनी केले, तर आभार प्रमुख कार्यवाहक संतोष धोत्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयुक्त कार्यवाहक गंगाधर म्हात्रे, उपाध्यक्ष शंकरराव रहाणे आदी प्रयत्नशील होते.
अनिलराज रोकडे, विजय गायकवाड, प्रल्हाद उमाटे, दीपक कैतके, कल्याण अन्नपूर्णे, चंद्रकिरण कुळकर्णी. ॲड. निलेश राऊत, किसन कटरे, संतोष झगडे, कलंदर शेकनाग, सुनील टिप्परसे, प्राचार्य प्रशांतकुमार मोहिते, जगदीशकुमार कुंटे, सुनील म्हामुणकर, गुरुनाथ तिरपणकर, शुरसेनानी संजय वेंगुर्लेकर, सुभाष सूर्यवंशी, उमाकांत वाघ, डॉ. पल्लवी बनसोडे, प्रा.अनंत येवलेकर यांचाही या कार्यक्रमात गौरव झाला.