नागरिक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा सहभाग*
*ठाणे (२९) – स्वच्छ शहराच्या जनजागृतीसाठी ठाणे महापालिकेतर्फे बुधवारी सकाळी ठाणे शहरात ‘स्वच्छता मशाल मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छोत्सव -२०२३ अंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये शून्य कचरा मोहिमेबद्दल जागृती करण्यासाठी तसेच नागरिकांचा कृतीशील सहभाग नोंदवण्यासाठी या मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
कोर्ट नाका चौक ते शहीद उद्यान या मार्गावर झालेल्या या स्वच्छता मशाल मार्चमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार आणि समाज विकास विभागाच्या उपायुक्त वर्षा दीक्षीत यांनी सहभागी नागरिकांचे स्वागत केले.
शहीद उद्यानात स्वच्छता मोहिमेचेही आयोजन करण्यात आहे. त्याचवेळी उपस्थितांनी शहर स्वच्छ राखण्याची प्रतिज्ञा केली. एकल वापराचे प्लास्टिक आणि थर्माकोल यांचा वापर टाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, शून्य कचऱ्याचे उद्दीष्ट साध्य होईल, अशा जीवनशैलीचा अंगीकार करणे याचे स्मरण या प्रतिज्ञेच्या निमित्ताने करून देण्यात आले. ‘चला ठाणे बदलूया’ या उपक्रमांतर्गत महिला वॉर्ड कॅप्टनचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.