ठाणे 25 : तुम्हाला आपले शहर कसे असावे असे वाटते?… शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का?.. बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विविध शाळांमधील मुलांसोबत आज संवाद साधला. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आपण देखील सहकार्य करणे आवश्यक आहे, रस्त्यावर कचरा टाकणे जर बंद झाले तर आणि तरच आपल्याला शहरातील रस्ते स्वच्छ दिसतील.. यासाठी शिक्षकांनी स्वच्छता हा विषय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून समजावून सांगणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील समस्या काय आहेत याबाबत मुलांकडून जाणून घेणे महत्वाचे असल्याचे वक्तव्य आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
निमित्त होते ठाणे महानगरपालिका आयोजित ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभांचे. महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमात विविध विषयावर सादर केलेल्या विजेत्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त तुषार पवार, उमेश बिरारी, अनघा कदम, वर्षा दिक्षीत तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
कचरा उचलणे हे जरी महापालिकेचे काम असले तरी कचरा नागरिकांनी रस्त्यावर न टाकणे हे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जबाबदार नागरिक म्हणून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे आदी सारखी कर्तव्ये पाळणे महत्वाचे आहे. आपण समूहामध्ये वावरत असताना माझ्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना आपल्यापासून त्रास होणार नाही, तसेच त्यांचेही जीवन माझ्यामुळे सहजसोपे होईल यासाठी आपण काय करु शकतो ही भावना प्रत्येकाने मनात ठेवली तर त्याची उत्तरे आपल्याला आपोआपच मिळतील या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवल्या पाहिजेत असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. आजची मुले ही उद्याची भावी पिढी आहे, या वयातच आपण त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर ते निश्चितच जबाबदार नागरिक बनतील असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.
सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करणे म्हणजे भित्रेपणा नाही, तर नियमांचे पालन जो करतो त्याची वृत्ती धाडसी असते अशा प्रकारे शिक्षकांनी विद्यार्थ्याचे प्रबोधन करावे असेही आयुक्तांनी नमूद केले. ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे तसेच पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व परीक्षकांचे अभिनंदन केले. तसेच इंडियन स्वच्छता लीग 2.0 या ठाणे महापालिकेच्या राबविलेल्या उपक्रमाची दखल केंद्र सरकारनेही घेतली असल्याचे आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
संवादातून मुलांची मते जाणून घेत असताना विद्यार्थ्यांनीही आपली मते व्यक्त केली.. बसमधून प्रवास करताना आपल्याकडील खाण्याच्या वस्तूची आवरणे ही रस्त्यावर न टाकता आपल्या पिशवीत ठेवावीत. तसेच शहरातील अनेक ठिकाणच्या पुलाच्या पिलर्स हे थुकूंन अस्वच्छ झाल्याचे आढळतात. तर काहींनी शाळांमधील स्वच्छता ही नियमित होत असल्याचे सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकपासून बनविलेल्या वस्तूंची माहिती यावेळी दिली.
‘वेस्ट टु बेस्ट’ संकल्पनेवर आधारीत स्पर्धेचे परीक्षण स्वत्व संस्थेचे श्री.रवि शृगांरपुरे व त्यांच्या 10 सहकाऱ्यांनी केले तर पर्यांवरणपूरक गणपती व ‘वेस्ट टू बेस्ट’ या स्पर्धेचे परीक्षण पर्यावरण दक्षता मंडळाचे श्री. विद्याधर वालावलकर, संगीता जोशी यांच्या सहकाऱ्यांनी केले.
इंडियन स्वच्छता लीग 2.0 मध्ये विजेते ठरलेले प्रकल्प व शाळांची माहिती पुढीलप्रमाणे
कचऱ्यातून सर्वोत्तम प्रतिकृती तयार करणे (खाजगी शाळा)- अंबर इंटरनॅशनल शाळा – प्रथम, बेडेकर विद्यामंदिर – द्वितीय, सरस्वती सेकंडरी शाळा – तृतीय. (ठामपा शाळा) – ठामपा शाळा नं. 64- प्रथम, ठामपा शाळा नं. 78- द्वितीय. सावित्रीबाई थिराणी विद्यालय – उत्तेजनार्थ
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्पर्धा (खाजगी शाळा)- आनंद विश्व गुरूकुल – प्रथम, होली क्रॉस शाळा – द्वितीय, श्रीरंग शाळा प्राथमिक विभाग – तृतीय. (ठामपा शाळा )- ठामपा शाळा नं. 64 – प्रथम, ठामपा शाळा नं 9- द्वितीय.
स्वच्छता संकल्पनेवर आधारित स्पर्धा (खाजगी शाळा)- सेंट जॉन बाप्टीस्ट शाळा – प्रथम, होली स्पिरीट शाळा – द्वितीय, मनिषा विद्यालय – तृतीय, एससीआयपीएसशाळा- उत्तेजनार्थ 1, लिटील एंजल शाळा – उत्तेजनार्थ 2 (ठामपा शाळा)- ठामपा शाळा क्र. 41 – प्रथम, ठामपा शाळा क्र 95- द्वितीय, ठामपा शाळा क्र. 15 – तृतीय, ठामपा शाळा क्र. -60 उत्तेजनार्थ 1.
बेंजो स्पर्धा – विनोद म्युझिकल ग्रुप- लोकमान्यनगर, परी बिट्स म्युझिकल ग्रुप – द्वितीय, झंकार बिट्स म्युझिकल ग्रुप – तृतीय