स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महापालिकेतर्फे रॅलीचे आयोजन
ठाणे 30- ‘रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक..’ ‘स्वभाव स्वच्छता.. संस्कार स्वच्छता’, ‘इतरत्र कुठेही कचरा टाकू नका.. आपले शहर स्वच्छ ठेवा’ असा संदेश देणारी ‘स्वच्छता सायक्लोथॉन रॅली 2024’ आज ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात काढण्यात आली. या सायकल रॅलीत ठाण्याचे सायकल महापौर चिराग शहा यांच्यासह ठाणे व इतर परिसरातील जवळपास 300 सायकलस्वार सहभागी झाले होते.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी सायक्लॉन आज ठाणे महापालिका भवन येथून आयोजित करण्यात आली होती. या सायकलरॅली प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सायकलस्वारांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
सकाळी सात वाजता या सायकल रॅलीस प्रारंभ झाला. सदरची सायकल रॅली ठाणे महापालिका भवन, पाचपाखाडी सर्व्हिस रोड येथून तीन हात नाका.. हरिनिवास सर्कल येथून पुन्हा महापालिका भवन येथे समाप्त करण्यात आली.
या सायकल रॅलीत मुलुंड रायडर्स, पेडल वॉरियर्स, आर.बी.ग्रुप, सह्याद्री रायडर्स, डीसीसी, पनवेलचे सायकल महापौर, रुनाथॉन ग्रुप यांच्यासह ठाणे शहरातील अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. टीम व्हील्स ॲड बॅरल्स सायकल ग्रुपच्या शालिनी राठोड, सर्वप्रीत नारु, सिद्धार्थ शहा, ॲङ स्वाती दिक्षीत यांचे सहकार्य लाभले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता सायक्लॉन रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांना स्वच्छतेचा संदेश देणारे टी शर्ट, मेडल्स आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.