Tuesday, July 23 2019 1:51 am

स्टॉल वाटपात दिव्यांगांना छळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे आदेश

ठाणे -:  दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजने अंतर्गत ठाणे शहरातील दिव्यांगांना स्टॉल वाटप करण्याचा निर्णय ठाणे महानगर पालिकेने घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात  संबधीत अधिकार्‍यांकडून हयगय केली जात आहे. कागदपत्रांच्या नावाखाली दिव्यांगांची ससेहोलपट केली जात आहे. या संदर्भात बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना  आणि हमराही एजुकेशन एंड चेरीटेबल ट्रस्ट (रजि.)चे मोहम्मद यूसुफ फारुख खान यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची भेट घेतली असता, मंजुळे यांनी, दिव्यांगांचा छळ करणार्‍या  ठामपाच्या संबधीत अधिकार्‍यांवर तसेच कारकुनांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या संदर्भात त्यांच्याकडून ठामपाशी पत्रव्यवहारही करण्यात येणार आहे.
 बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना  आणि हमराही एजुकेशन एंड चेरीटेबल ट्रस्ट (रजि.)चे मोहम्मद यूसुफ फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल गफार शेख मुन्ना भाई, आशिक अली सुर्वे, संजय यादव यांच्या शिष्टमंडळाने दिव्यांग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन दिले. निधी देऊन दिव्यांगांना भिकार्‍याची वागणूक ठामपाकडून दिली जात आहे. 3 डिसेंबर रोजी या स्टॉलचे वाटपपत्र देण्यात आले आहे. यावेळी वाटपपत्र देताना 1 हजार रुपये अनामत रक्कम भरावी आणि 979 रुपये भाडे जमा करण्यात यावे, त्याचबरोबर या बाबत महापालिकेशी योग्य तो कारनामा करण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाकडे संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, दिव्यांग संबधित विभागात गेले असता;  त्यांना हाकलून लावण्यात आले.  या प्रकरणी  तक्रार प्राप्त झाल्यावर सदर बाबतीत गांभीर्याने दखल घेण्याकरिता तक्रार केल्यानंतर आपणाकडे आदेश आले नसल्याचे कारण सांगण्यात येते. जर वाटपपत्र प्रदान केले असतानाही अशी परिस्थिती असेल तर या मागे अधिकार्‍यांकडून दिव्यांगांचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप खान यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला होता. तसेच,  ठाणे पालिका प्रशासन राजकीय दबावाखाली काम करून गरजू दिव्यांग व्यक्तीचे हक्क डावलून राजकीय पुढार्‍यांच्या दबावाखाली ज्यांना मुंबईमध्ये स्टॉल मंजूर झाले आहेत,अशा लोकांना स्टॉलचे वाटप करीत आहे.   एका तथाकथीत दिव्यांग नेत्याला अशा पद्धतीने स्टॉलचे वाटप करण्यात आलेले आहे, असेही दिव्यांग आयुक्त मंजुळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.  या तक्रारींची मंजुळे यांनी गांभीर्याने दखल घेऊन तक्रारीचे रुपांतर याचिकेत करणयात येणार असल्याचे सांगितले. सदरचे काम पाहणार्‍या अधिकार्‍यांवर, कारकुनांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच, या आधीच लाभ घेतलेल्यांना  पुन्हा लाभार्थी बनवल्याप्रकरणी ठामपा अधिकार्‍यांसह संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही सांगितले.